विशेषण
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. ज्याचे वर्णन केले जाते ते विशेष्य तर वर्णन करणारा शब्द विशेषण असतो.
उदा.
१) कडू कारले
२) मंजुळ आवाज
३) उंच इमारत
वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द हा त्याच्यापुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगतो.
१) कडू कारले ( कारले कसे ? - कडू )
२) मंजुळ आवाज (आवाज कसा ? - मंजुळ)
३) उंच इमारत (इमारत केवढी? - उंच)
म्हणजेच वरील उदाहरणातील , 'कडू, मंजुळ, उंच' हे शब्द 'कारले, आवाज, इमारत' या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात व नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, म्हणून वरील जोड्यांमधील 'कडू, मंजुळ, उंच' हि विशेषणे आहेत. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात कुठेही असला तरी तो विशेषणच असतो.
नमुना प्रश्न:
१) 'वर्तमानपत्रे नवनवीन घडामोडींची माहिती देतात.' या वाक्यातील विशेषण ओळखा.
१) वर्तमानपत्रे २) नवनवीन ३) घडामोडींची ४) माहिती
स्पष्टीकरण : वरील वाक्यात वर्तमानपत्रे, घडामोडी व माहिती हि नामे आहेत तर देतात हे क्रियापद आहे. 'नवनवीन' हे 'घडामोडींची' या नामाचे विशेषण आहे. म्हणून पर्याय (२) हे उत्तर बरोबर आहे.
विशेषणाची की उदाहरणे -
१) मला गोड बिस्किटे आवडतात.
२) पिकलेला आंबा सर्वांना आवडतो.
३) सुधीरच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे.
४) माझी सर्व पुस्तके पावसात भिजली.
५) वाईट नवरा नको ग बाई !
६) काकांना चार मुली आहेत.
७) पिवळी पाने गळून पडतात.
८) आईने रमेशला दहा रुपये दिले.
९) राधा हसरी मुलगी आहे.
१०) हा विषारी प्राणी आहे.
वरील वाक्यातील ठळक शब्द विशेषणे आहेत.
चला तर विद्यार्थी मित्रांनो वरील घटक आपण अभ्यासला असेलच तर आता तो आपल्याला किती समजला हे खाली दिलेली टेस्ट सोडवून तपासूयात......