१० वी निकाल गुण पडताळणी व छायांकित प्रत पद्धत
1) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास त्या परीक्षेतील स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त ) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (website) स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. ज्या विषयांसाठी गुणपडताळणी करणे आवश्यक आहे ते सर्व विषय एकाचवेळी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही. |
2) ऑनलाईन अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरील विहित नमुन्यात प्रत्येक परीक्षेच्या वेळी ऑनलाईन निकाल जाहीर केल्याच्या दिनांकापासून १० दिवसांपर्यंत करणे आवश्यक राहील. अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक प्रत्येक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात येईल. |
3) गुणपडताळणीसाठी प्रती विषयास रु. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking ) भरता येईल. |
4) गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरणे अनिवार्य असेल . अपूर्ण माहिती भरलेले अर्ज, कमी शुल्क भरलेले , शुल्क न भरलेले व मुदतीनंतर प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. |
5) गुणपडताळणी नंतर गुणात बदल झाल्यास सदरचा बदल विद्यार्थ्यावर बंधनकारक राहील. त्यानुसार गुणपडताळणीनंतर संबंधित विद्यार्थ्याची मूळ संपादणूक आपोआप रद्द होईल व गुण कमी झाले तरी सुधारित संपादणूक स्विकारणे विद्यार्थ्यास बंधनकारक राहील. |
6) सवलतीचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सवलतीचे गुण मिळालेल्या विषयाच्या गुणपडताळणीसाठी अर्ज केला असेल व गुण पडताळणीत विद्यार्थ्याचे अशा विषयातील गुण कमी झाल्याने तो सवलतीच्या गुणासाठी अपात्र ठरत असेल तर अशा प्रकरणी विद्यार्थ्याच्या उत्तीर्ण निकालात बदल करण्यात येईल व तो स्विकारणे बंधनकारक असेल. |
7) उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यानी गुणपडताळणी च्या निकालाची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विहित मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र संबंधित विभागीय मंडळाकडे माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळेमार्फत / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारले जाणार नाही. |
8) गुणपडताळणीमधील गुण वाढीमुळे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळण्यास पात्र ठरत असल्यास त्यास ते गुण देय असतील. |
9) गुणात बदल नसलेल्या विद्यार्थ्याचे गुणपडताळणी शुल्क परत केले जाणार नाही मात्र गुणात बदल झालेल्या प्रकरणी विद्यार्थ्याने भरलेले शुल्क परत दिले जाईल. |
10) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ' नो चेंज' (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीत कोणताही बदल न होणे व उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ' नो चेंज' (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीनंतर गुणात कोणताही बदल न होणे किंवा गुणात पाच टक्क्यांहून कमी गुणांचा बदल झाल्यामुळे उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विषयाच्या निकालात व एकूण निकालात कोणताही बदल न होणे असा असेल. |
11) गुणपडताळणीमध्ये विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाल्यास तसे संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित माध्यमिक शाळेस / उच्च माध्यमिक शाळेस / कनिष्ठ महाविद्यालयास कळविण्यात येईल.त्यानुसार विद्यार्थ्याचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर त्यास सुधारित गुणपत्रक देण्यात येईल. |
12) उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/ यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील |
13) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेनंतरच्या स्थलांतर प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील |
14) विध्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी. अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही |
15) ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी .कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत |
16) उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करतांना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File स्वरूपात (File Size १५ MB पर्यंत) अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे |
17) विध्यार्थ्यानी तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी/शंका असल्यास (support@msbshse.ac.in) या ई-मेल आयडी वर अथवा ०२०-२५७०५२०७,२५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. |
18) ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी विध्यार्थ्यानी HELP या पर्यायाची निवड करावी. उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या चारही प्रकारासाठी स्वतंत्र व्हिडीओ देण्यात आलेले आहेत |
19) विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रकीयेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती (status) संकेतस्थळावर पाहता येईल.आपल्या अर्जावरील प्रकिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यकता भासल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. |